हतनूर धरणातून १० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; आठ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

हतनूर धरणातून १० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; आठ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

वरणगाव (ता. भुसावळ) | प्रतिनिधी –पावसाळी परिस्थितीमुळे हतनूर धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने काल (२७ जून) दुपारी १ वाजता धरण प्रशासनाकडून आठ दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले. यामुळे सुमारे २८८ क्युमेक्स (१०,१७१ क्युसेस) इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू करण्यात आला आहे.

सध्या धरणातील साठा २५३.८० दलघमी, म्हणजेच ६५.४१ टक्के भरलेला असून, धरणाची सच्च पाणीपातळी २११.४२० मीटर इतकी आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित अंतर राखावे, लहान मुले व जनावरे नदीकाठच्या भागात नेऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर

विसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस व महसूल विभाग सतर्क असून, नदीकाठच्या भागांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.