अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन; हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास

मुंबई – ‘काँटा लगा’ या सुपरहिट गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आणि बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवालाचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. प्रारंभिक माहितीनुसार, ती हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावली आहे.
२७ जूनच्या रात्री शेफालीच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या, त्यानंतर तिचे पती अभिनेता पराग त्यागी आणि काही नातेवाईकांनी तिला अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केल्याचं सांगितलं जात आहे.
यासंदर्भात शेफालीच्या कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
शेफालीच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.