भुसावळ-दादर विशेष गाड्यांना पुन्हा मुदतवाढ २९ सप्टेंबरपर्यंत धावणार त्रिसाप्ताहिक आणि साप्ताहिक रेल्वेगाड्या

भुसावळ-दादर विशेष गाड्यांना पुन्हा मुदतवाढ
२९ सप्टेंबरपर्यंत धावणार त्रिसाप्ताहिक आणि साप्ताहिक रेल्वेगाड्या

जळगाव – पश्चिम रेल्वेने भुसावळ-दादर स्थानकांदरम्यान सुरू केलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना प्रवाशांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, भुसावळ आणि दादर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक व त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या आता २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावणार आहेत. अमळनेर, नंदुरबारमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय यामुळे होणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून सुरुवातीला नंदुरबार-दादर दरम्यान विशेष रेल्वे सेवा जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र, खान्देशातील प्रवाशांकडून ही गाडी नंदुरबारऐवजी भुसावळहून सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला प्रतिसाद देत, जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी देखील पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर भुसावळ-दादर आणि दादर-भुसावळ या त्रिसाप्ताहिक विशेष गाड्यांचा प्रारंभ करण्यात आला.

सध्या दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) या त्रिसाप्ताहिक गाड्या दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावत आहेत. याशिवाय, दादर-भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) या साप्ताहिक विशेष गाड्या दर शुक्रवारी धावत आहेत. या गाड्यांना आधी २७ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहता त्यानंतरही दोन वेळा कालावधी वाढविण्यात आला.

आता या गाड्यांच्या सेवा बंद होण्याचा अंतिम कालावधी ३० जून २०२५ होता. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा निर्णय घेत दोन्ही गाड्यांना पुढील मुदतवाढ दिली आहे. नव्या निर्णयानुसार, दादर-भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ-दादर (०९०५०) ही साप्ताहिक विशेष गाडी ४ जुलैपासून २६ सप्टेंबर पर्यंत, तर दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) या त्रिसाप्ताहिक गाड्या २ जुलैपासून २९ सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील.

गाड्यांना मिळणारा उत्तम प्रतिसाद लक्षात घेता, भविष्यात या सेवा नियमित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी लवकरात लवकर नियोजन करावे, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.