यवतमाळच्या ड्रायव्हिंग स्कूलने केला ‘कार्यक्रम’;
फक्त दोन हजारांची लाच घेणारे तीन RTO अधिकाऱ्यांसह एजंट जाळ्यात

यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) सापळा कारवाईत तीन सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि एका खाजगी एजंटाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका असून, आरोपींनी ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेसाठी प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १० प्रशिक्षणार्थींच्या नावाने एकूण २,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे उघड झाले.
तक्रारीची पडताळणी आणि कारवाईचा दिवस
दिनांक ७ आणि १६ मे २०२५ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यानंतर १६ मे रोजी यवतमाळ येथील आरटीओ कॅम्पमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून आरोपी क्र. ४ बलदेव राठोड या एजंटाने पंचासमक्ष २,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही रक्कम सरकारी चलनाव्यतिरिक्त आरोपी क्र. १ सुरज गोपाल बाहिते, क्र. २ मयूर मेहकरे आणि क्र. ३ बिभीषण जाधव या तिघांच्या सांगण्यानुसार खाजगी इसमामार्फत स्वीकारण्यात आली होती.
सदर प्रकरणात आरोपींनी शासकीय पदाचा दुरुपयोग करून, प्रशिक्षणार्थींना शिकाऊ व कायम लायसन्स देण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच मागितल्याचा आरोप आहे. हे सर्व प्रकार आरटीओ कॅम्पमध्ये घडले असून, खाजगी एजंटच्या माध्यमातून संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आला.
सदर प्रकरणात वसंतनगर पोलीस स्टेशन, पुसद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांनी केले. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट करत असून, मार्गदर्शन पोलिस अधीक्षक मारुती जगताप आणि अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांनी केले.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागण्यात आल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा. “भ्रष्टाचारविरोधी लढ्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असा संदेशही या कारवाईद्वारे देण्यात आला आहे.