ई-बाईक टॅक्सी सेवेला रिक्षाचालकांचा विरोध; आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जळगाव | महा परिवहन न्यूज नेटवर्क
ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस सेवा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत बुधवारी शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. ऑटोरिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा येत असल्याचा आरोप करीत संबंधित सेवा त्वरित मागे घ्याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
संघटनांचे नेतृत्व व निवेदन सादर
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी व शहराध्यक्ष जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन पार पडले. यावेळी एका शिष्टमंडळाने आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला.
अनेक संघटनांचा सहभाग
या आंदोलनात नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन, शिवशक्ती वाहतूक सेना, ऑरीयन स्कूल वाहतूक युनियन, एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन, शहीद भगतसिंग रिक्षा युनियन, कर्तव्यदक्ष पोलिस मित्र संघटना अशा विविध संघटनांनी सक्रीय सहभाग घेतला.
ई-बस सेवेलाही विरोध
जळगाव शहर व लगतच्या परिसरात सुरू होणाऱ्या पीएम ई-बस सेवेमुळे पारंपरिक ऑटोरिक्षा व्यवसायावर परिणाम होणार असल्याने त्यालाही संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
इतर मागण्यांकडेही लक्ष वेधले
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ऑटो रिक्षाच्या खुले परवाने देणे तात्काळ बंद करावे, कल्याणकारी मंडळातील त्रुटी दूर कराव्यात, तसेच रिक्षाचालकांसाठी अधिक सुविधा पुरवाव्यात, अशा विविध मागण्याही मांडल्या.
प्रमुख उपस्थिती
या आंदोलनात सुनील जाधव, सुनील वाणी, राजू मोरे, शांताराम अहिरे, अशपाक शाह, विनोद कुमावत, नारायण पाटील, सरताज साहब, इमरान शेख, हितेंद्र टेकावडे, विनोद पवार, प्रमोद नेवे, फकिरा चव्हाण, हेमंत पाटील, सीताराम कुंभार, उमेश तायडे, संदीप वाणी, उमेश चौधरी, दिलीप शिंदे, राजू जयस्वाल, पद्माकर पाटील, सुनील चौधरी, संजय सोनवणे, छोटू कुंभार, समाधान महाजन, नितिन सोनार, नितीन विसपुते, मुस्ताक खान आदींसह मोठ्या संख्येने रिक्षाचालक व मालक उपस्थित होते.