कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून केले गंभीर जखमी

भुसावळ | प्रतिनिधी
तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका दांपत्यामधील कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बुधवारी (२१ मे) सायंकाळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकामस्थळी राहणाऱ्या दांपत्यात वाद
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लालिया करते वय अंदाजे ३५ आणि त्यांची पत्नी आशाबाई संतोष करते (दोघेही रा. भगवानपुरा, जि. खरगोन, म. प्र.) हे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळी किन्ही येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता.
मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला
मंगळवारी (२० मे) रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान वाद उफाळून आल्यावर संतोष यांनी संतापाच्या भरात जवळच पडलेला लोखंडी हातोडा उचलून पत्नी आशाबाई यांच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात उपचार सुरू
जखमी अवस्थेत आशाबाईंना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती त्यांच्या भावाने – राजेश बारी यांनी पोलिसांना दिली.
गुन्हा दाखल; तपास सुरू
त्यांच्या तक्रारीवरून संतोष करते याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.