चोपडा येथे ज्वारी खरेदीस सुरुवात : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा

चोपडा येथे ज्वारी खरेदीस सुरुवात : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा

चोपडा प्रतिनिधी l  – शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यात ज्वारी खरेदीला औपचारिक सुरुवात करण्यात आली. शुक्रवार, दि. २८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता चोपडा येथील शासकीय गोदाम, मोजे चहार्डी येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते व पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दादा निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमाला तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक साळवे, पुरवठा तपासणी अधिकारी किरण मेश्राम, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, पुरवठा निरीक्षक मेघना गरुड, तसेच प्रकाश रजाळे, रावसाहेब पाटील, दीपक बिर्‍हाडे, बंडू चौधरी, किरण पाटील व जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुका शेतकी संघाच्या माध्यमातून एकूण २८६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, सुमारे ६१०० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ज्वारीच्या आधारभूत दराने खरेदी होण्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.