अल्पवयीन मुलीची विक्री, जबरदस्तीचे लग्न आणि धमक्यांमुळे पित्याची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

अल्पवयीन मुलीची विक्री, जबरदस्तीचे लग्न आणि धमक्यांमुळे पित्याची आत्महत्या 

कुटुंबीयांचा पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप : लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची सूत्रांची माहिती

जळगाव, २९ जून – अल्पवयीन मुलीची विक्री, तिच्यावर जबरदस्तीने लावण्यात आलेले लग्न, गर्भधारणा आणि गर्भपात याच्या धक्क्यांमुळे मानसिकदृष्ट्या कोलमडलेल्या पित्याने रविवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हरीविठ्ठल नगर परिसरात घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमध्ये मुलींचे विवाह लावून पैसे लुबाडणारी टोळी सक्रिय असल्याची बाब समोर लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील काही महिलांनी रोजगाराचे आमिष दाखवून पीडित मुलीला नाशिक येथे नेले. त्यानंतर अडीच लाख रुपये रोख आणि दागिन्यांच्या मोबदल्यात तिची कोल्हापूर येथील काही व्यक्तींना विक्री करण्यात आली. इतकेच नव्हे तर तिच्यावर बळजबरीने लग्न लावण्यात आले आणि ती पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आला.

संपूर्ण घटनेने त्रस्त होऊन मुलगी घरातून पळून येत कुटुंबीयांकडे परतली आणि घडलेली आपबीती सांगितली. हे ऐकून कुटुंबीय सुन्न झाले. त्यांनी तत्काळ रामानंदनगर पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

 

कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होऊन कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींच्या विक्रीसंदर्भातील हा एक मोठा रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. तसेच घडलेल्या प्रकाराची पोलिसांत नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसात तक्रार दाखल, सखोल तपास सुरू
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसापूर्वी पोलिसात दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, काही महिलांनी त्या मुलीला आमीष दाखवून तिचे लग्न कोल्हापूर येथे लावून देण्यात आले होते. एप्रिल महिन्यात तिचा गर्भपात झाला होता. मुलगी कुटुंबियांच्या संपर्कात देखील होती मात्र त्यांना इतर प्रकार माहिती नसल्याचे म्हटले जाते. तसेच कोल्हापूर येथील मंडळींच्या देखील ती संपर्कात होती. कोल्हापूर येथील लोक घरी येऊन पैसे किंवा मुलगी परत देण्याचे सांगत होते. दरम्यान, लग्न लावून देणाऱ्या महिलांनी हा सर्व प्रकार समोर आणला नाही, उलट मुलगी अनाथ असल्याचे सांगितले होते अशी माहिती समोर येत आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे रामानंद नगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून असून सखोल तपास सुरू आहे.