लाडक्या बहिणींना आजपासून १५०० रुपये मिळणार

मुंबई : लाडकी बहीण योजनेंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने ३६०० कोटी रुपये वर्ग केले आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार, ३० जूनपासून १५०० रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्य सरकारकडून दर महिन्याला २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात येतात. मात्र, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने जून महिन्याचे पैसे अद्याप जमा केले नव्हते. अखेर सोमवारपासून पावसाळी अधिवेशन होत असल्याने विरोधक सरकारला लक्ष्य करतील, या भीतीने राज्य शासनाने लाडक्या बहिणीसाठी रविवारी ३६०० कोटी रुपये महिला व बालकल्याण खात्याकडे वर्ग केले. आता सोमवारपासून महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होतील.