नाशिक-जळगावात दमदार पाऊस; गिरणा धरणाचा जलसाठा ३९.६६ टक्क्यांवर

चाळीसगाव (प्रतिनिधी) : गिरणा धरणात पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे २१ टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र, पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शनिवार, ५ जुलै रोजी सायंकाळपर्यंत धरणात पावसामुळे एकूण १९ टक्क्यांनी वाढ होऊन सध्या जलसाठा ३९.६६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. चणकापुर आणि पुनद धरणातून तसेच ठेंगोळा बंधाऱ्यातून पावसाचे पाणी गिरणा धरणात येत आहे.
धरणाचा जलसाठा वाढत असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नियमित राहिल्यास येत्या आठवड्यात जलसाठा ५० टक्क्यांच्या घरात जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.