जळगावात खेळताना चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू : विद्यानगरात शोककळा

जळगावात खेळताना चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू : विद्यानगरात शोककळा

जळगाव : विद्यानगर परिसरात सोमवारी (७ जुलै) दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. खेळताना दोरीच्या फासात अडकल्याने हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय १२) या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अहिरे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रदीपकुमार अहिरे हे विद्यानगरात राहतात आणि रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी २०१५ मध्ये पुण्यातील एका संस्थेतून ९ महिन्यांचा हार्दिक दत्तक घेतला होता. हार्दिक हा कुटुंबाचा आनंद होता.

सोमवारी शाळेतून घरी परतल्यानंतर हार्दिकने चहा-बिस्किटे खाल्ली. त्याची आई लहान भावाला ट्युशनला सोडण्यासाठी बाहेर गेली होती. दरम्यान, हार्दिक शेजारील पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळण्यासाठी गेला. तिथे छताला लावलेल्या दोरीत त्याचा गळा अडकला आणि ही दुर्घटना घडली. त्यावेळी घरात कोणी नव्हते.

काही वेळाने शेजारच्या एका महिलेने ही घटना पाहिली आणि आरडाओरड केली. हार्दिकच्या आईने तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात नेले आणि नंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने विद्यानगर परिसर आणि हार्दिकच्या शाळकरी मित्रांमध्ये शोक पसरला आहे. अहिरे कुटुंब शोकाकुल आहे.