पिंप्राळा विठ्ठल मंदिराचा १४ पौर्णिमेला पालखी उत्सव उत्साहात संपन्न; ग्रामीण मार्गावरून रथातील राधाकृष्ण मूर्तीचे दर्शन

जळगाव(प्रतिनिधी): पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिरात १४ पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री ८.३० ते ११.३० या वेळेत झालेल्या या पालखी उत्सवात रथावर विराजमान असलेल्या राधाकृष्ण मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
विशेष म्हणजे, रथ मोठ्या मार्गांवरून नेण्यास अडचण असलेल्या ग्रामीण भागातील छोट्या गल्ली व वस्त्यांमध्येही या पालखीचा प्रवास झाला. त्यामुळे घराबाहेर येऊ न शकणाऱ्या ग्रामस्थांना आपल्या दारीच राधाकृष्णाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे देवदर्शन घरीच मिळावे, ही भक्तांची दीर्घकालीन इच्छा या उत्सवातून पूर्ण झाली.
या पालखी उत्सवात पांडुरंग भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर संस्थानच्या कार्यकारिणी सदस्यांसह संपूर्ण वाणी समाज बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला. टाळ, मृदंगाच्या गजरात आणि हरिनाम संकीर्तनाच्या जल्लोषात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले.