अमळनेर पोलिसांची कारवाई : मध्य प्रदेशातून चोरीच्या तीन चारचाकी वाहनांसह एक अटकेत

अमळनेर पोलिसांची कारवाई : मध्य प्रदेशातून चोरीच्या तीन चारचाकी वाहनांसह एक अटकेत

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरातील ओमसाई श्रद्धा नगर येथून चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाच्या तपासात अमळनेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील रावती गावात छापा टाकत तीन चोरीची वाहने हस्तगत केली असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

दि. २४ मे २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता ते २५ मेच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान प्रविण हरिश्चंद्र ठाकूर (वय ४४) यांच्या मालकीची मारुती सुझुकी डिझायर (MH18 AJ 3110) ही गाडी त्यांच्या ओमसाई श्रद्धा नगरमधील घरासमोरून चोरीस गेली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीच्या तपासासाठी तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय माहितीचा वापर करून अमळनेर पोलीस पथकाने शोधमोहीम सुरू ठेवली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्य प्रदेशातील सीतामऊ तालुक्यातील रावती गावात धाड टाकली.

तेथे संशयित राहुल पाटीदार याच्या घराजवळ असलेल्या गोडाऊनमध्ये शोध घेतला असता खालीलप्रमाणे तीन वाहने आढळून आली:

टोयोटा फॉर्च्युनर (CG10 BL 6776) – अंदाजे किंमत ३५ लाख रुपये; चेसिस नंबर पुसलेला.

हुंडई क्रेटा (MP04 Z12963) – अंदाजे किंमत १२ लाख रुपये; चेसिस आणि इंजिन नंबर नष्ट केलेले.

मारुती सुझुकी डिझायर (MH18 AJ 3110) – अमळनेरमधून चोरीस गेलेली.

ही सर्व वाहने पोलिसांनी ताब्यात घेत अमळनेर पोलीस ठाण्यात आणली असून, पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत या तिन्ही वाहनांचे इतर जिल्ह्यांतील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फॉर्च्युनर ही गाडी नागपूर येथील राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यातील, तर क्रेटा ही गाडी जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील चोरीच्या प्रकरणाशी संबंधित आहे.

ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मामदेव बोरकर, विनोद संदानशिव, निलेश मोरे, प्रशांत पाटील आणि उज्वल म्हस्के यांच्या गुन्हे शोध पथकाने केली. संशयित राहुल पाटीदार याच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.