हरिविठ्ठल नगरात घरात घुसून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला

रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): हरिविठ्ठल नगर येथे घरात जबरदस्तीने घुसून दोन जणांनी तरुण आणि त्याच्या शालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्देश मंगेश पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठल नगर) हे त्यांच्या घरी शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांच्यासोबत गप्पा मारत असताना ८ जुलै रोजी अचानक दोन अनोळखी व्यक्ती घरात घुसले. त्यांनी दोघांना शिवीगाळ केली आणि मारहाण करत उद्देश पाटील यांच्या कानावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात उद्देश पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
उद्देश पाटील हे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करतात. घटनेनंतर त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.