अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी

181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबई, : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण यांनी विधानससभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १५० एमबीबीएस व ८७ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक व रुग्णसेवा सुविधा असून क्षमतेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने तातडीने सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी २८० खाटांची दुरुस्ती, २५० क्षमतेच्या वसतिगृहाचे बांधकाम, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, डांबरी रस्त्यांचे बांधकाम,जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचे बीएससी नर्सिंगमध्ये रुपांतर करणे यासाठी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांसाठी १८१ कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

याचबरोबर रिक्त प्राध्यापक पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयात कॅन्सर उपचारासाठी एल-१,एल-२, एल-३ सुविधांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी यांसारख्या सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘एनपीएनजीसी’ योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित करण्यात येतील, असे आश्वासनही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.