छतावरील पाण्याच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू; चोपडा शहरातील दुर्दैवी घटना

चोपडा (प्रतिनिधी) – घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत पडून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२१ मे) दुपारी चोपडा शहरात घडली. महेंद्र सुरेश शेवले (वय ३५, रा. पाटील वाडा, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महेंद्र शेवले हे आपल्या कुटुंबासह पाटील वाडा परिसरात राहत होते. २१ मे रोजी दुपारच्या सुमारास घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीजवळ काही कामासाठी गेले असता, अचानक तोल जाऊन टाकीत पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे करीत आहेत.