मध्यरात्री घरफोडी करून दोन लाखांचे मोबाईल चोरले; अल्पवयीन चोरटा गजाआड

मध्यरात्री घरफोडी करून दोन लाखांचे मोबाईल चोरले; अल्पवयीन चोरटा गजाआड

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नशेमन कॉलनीमध्ये मध्यरात्री घरफोडी करून दोन लाख रुपये किंमतीचे तीन मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे सर्व मोबाईल जप्त केले असून, ही कारवाई सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात आली.

तन्वीर मजहर पटेल (रा. नशेमन कॉलनी) यांच्या घरी १८ मे रोजी रात्री चोरट्याने प्रवेश करत, घरात झोपलेल्या अवस्थेत घरफोडी केली आणि तीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा शोध

गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले तीनही मोबाईल हस्तगत केले आहेत.

या कारवाईत उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, योगेश बारी आणि योगेश घुगे यांनी सहभाग घेतला.