मुक्ताईनगर- (प्रतिनिधी ) : तालुक्यातील तरोडा ते रूईखेडा गावांच्या दरम्यान बसला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत चालकासह प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

भरधाव वेगाने धावणारे डंपर हे अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरत असतात. आज मुक्ताईनगर तालुक्यात गौण खनीज वाहून नेणाऱ्या अशाच एका डंपरने बसला धडक दिली. ही बस मुक्ताईनगरवरून निघून मलकापूर येथे जात होते. डंपरच्या धडकेत बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले.
या अपघातात बसच्या चालकासह सुमारे सहा ते सात प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला. तर या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.