गोदावरीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला स्वयंचलित सोलर पॅनल क्लिनर रोबो

जळगाव – प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्ष यांत्रिक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि पर्यावरणपूरक प्रकल्प राबवत “स्वयंचलित ऑर्डिनो संचालित सोलर पॅनल क्लिनर रोबो” तयार केला आहे.

हा प्रकल्प प्रा. मयूर पी. ठाकूर आणि प्रा. किशोर एम. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये तुषार पाटील, वैभव पाटील, यद्नेश ठाकरे आणि निरज नारखेडे यांचा समावेश आहे. त्यांनी सौरऊर्जेच्या क्षेत्रात मोठा अडथळा ठरणाऱ्या समस्येवर – म्हणजेच सोलर पॅनलवर जमा होणाऱ्या धुळीमुळे उत्पादनात होणाऱ्या घटवर – अत्यंत सोपा व परिणामकारक उपाय शोधला आहे.

ऑर्डिनो प्रोग्रामिंगचा वापर करून त्यांनी तयार केलेला हा रोबो पूर्णपणे स्वयंचलित असून तो कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना सोलर पॅनलवर फिरून स्वच्छता करतो. यात सेन्सर्स आणि मोटरचा उपयोग करण्यात आला असून, रिमोट लोकेशनवरील मोठ्या क्षमतेच्या सोलर पॅनेल प्रकल्पांसाठीही हा रोबो उपयुक्त ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ होईलच, शिवाय देखभालीसाठी लागणारा खर्च व वेळही वाचणार आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिनव कल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.