बहिणाबाई-सोपानदेव साहित्य संमेलन उत्साहात

जळगाव – प्रतिनिधी | कविवर्य स्व. पुरुषोत्तम (मालतीकांत) नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अठरावे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन जळगावात करण्यात आले. विविध साहित्यिक आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न झाले.

साहित्य नगरीतील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे आयोजित या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. फुला बागुल होते.

संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीतून करण्यात आली. यानंतर दीपप्रज्वलन करून व बहिणाबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सत्र पार पडले. संमेलनात डॉ. अरविंद नारखेडे यांना ‘बहिणाबाई सोपानदेव मालतीकांत जीवन गौरव पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला, तर पत्रकार शैलेंद्र ठाकूर यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात माजी नगरसेवक अमित काळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, स्वागताध्यक्ष पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुळे, डॉक्टर विलास नारखेडे, बी.एन. चौधरी आदींचा समावेश होता. या संमेलनाने खानदेशातील साहित्यिक परंपरेचा जागर केला आणि नवोदित व ज्येष्ठ साहित्यिकांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ सिद्ध झाले.