जळगाव – प्रतिनिधी | प्रसिद्ध विधिज्ञ आणि खंदे सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले.

निकम कुटुंबीय, समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. रोहित निकम, शैलेजा निकम आणि रितेश निकम यांनी एकमेकांना पेढे भरवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांमधून उत्साह ओसंडून वाहत होता.
यावेळी आमदार सुरेश भोळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी मंत्री व समाजसेवक उपस्थित होते. अॅड. निकम यांनी आपले संपूर्ण आयुष्य न्यायव्यवस्थेसाठी समर्पित केले आहे. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला, कसाब प्रकरण, तसेच इतर अनेक गाजलेले खटले यशस्वीपणे हाताळले आहेत.
लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर मिळालेली ही राज्यसभा संधी म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन समर्पणाची व कर्तृत्वाची पावती असल्याचे मत सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे. ही नियुक्ती जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाची बाब मानली जात आहे.