बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ई-रिक्षा सेवा सुरू

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे. विद्यापीठात आज, १४ जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते ई-रिक्षा सेवेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि वाहन समितीचे अध्यक्ष नितीन झाल्टे, प्रा. म.सु. पगारे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, ॲड. अमोल पाटील, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, डॉ. संदीप पाटील, राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील तसेच अनेक प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठातील वाहन समितीने शिफारस केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारत या दरम्यान ई-रिक्षा धावणार आहे. बाहेरगावावरून विविध शैक्षणिक कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने दोन ई-रिक्षा खरेदी करून विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे प्रशाळेत जाण्या-येण्यात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असून वेळेचीही बचत होईल.

यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी शरद पाटील व सहायक संजय पाटील यांच्यासह इतर विभागांचे कर्मचारीही उपस्थित होते.

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक परिसरात पर्यावरणपूरक आणि विद्यार्थी केंद्रित दळणवळण प्रणालीची पायाभरणी झाली असून भविष्यात आणखी सुधारणा करण्याचा मानस विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.