जुना खेडी रस्ता परिसरातील नागरी समस्या ऐरणीवर : महिलांचा ठिय्या

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील जुना खेडी रस्ता, डीएनसी कॉलेज परिसर, दत्तनगर, सुनंदिनी पार्क तसेच गट क्रमांक 75 ते 78 या भागातील नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आज महिलांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रस्त्यांची दुरवस्था, गटारांची निकृष्ट अवस्था, डीपीची उभारणी व कचऱ्याचा प्रश्न यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला.

या आंदोलनात महिलांनी शांततेत आपली मागणी मांडली. त्यानंतर माजी नगरसेवक भरत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली काही महिलांचे शिष्टमंडळ आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेण्यासाठी गेले. शिष्टमंडळाने आपल्या भागातील समस्या सविस्तर मांडत म्हटले की, “गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ते व गटारांची कामे रखडली आहेत. कचरा व्यवस्थापन नीट नाही. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.”

या चर्चेत आयुक्त ढेरे यांनी महिलांना माहिती दिली की, “शहरातील रस्ते व गटारांच्या दुरुस्तीसाठी 58 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तुमच्या भागातील कामेही त्यात समाविष्ट आहेत व लवकरच ती सुरू होतील.” मात्र महिलांनी केवळ आश्वासन नको, तात्काळ कृती हवी अशी ठाम भूमिका घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

या चर्चेदरम्यान काही काळ नागरिक व आयुक्त यांच्यात शाब्दिक खडाजंगीही झाली. महिलांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला की, “जर त्वरित कामे सुरू झाली नाहीत तर पुढचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

महिलांच्या या ठिय्या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाला जाग येईल, अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. नागरी सुविधा मुलभूत हक्क असून प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी महिलांनी या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित केली.