जळगाव प्रतिनिधी | राज्य शासनाच्या अन्यायकारक कर व शुल्कवाढीविरोधात जळगावातील बियर बार मालक, वाईन शॉप चालक व संबंधित कर्मचाऱ्यांनी आज मूक मोर्चा काढत आपला तीव्र विरोध व्यक्त केला. अचानक वाढवण्यात आलेला वॅट, नूतनीकरण शुल्क व प्रचंड प्रमाणात वाढलेली एक्साईज ड्युटी यामुळे संपूर्ण व्यवसाय संकटात सापडल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने व बियर बार एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी व्यवसायिक व कर्मचाऱ्यांनी हातात निषेधाचे फलक धरत कोणताही गोंधळ न करता आपली भूमिका ठामपणे मांडली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर करत संघटनेच्या वतीने वाढीव वॅट, नूतनीकरण शुल्क व एक्साईज ड्युटी तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. “या अचानक वाढीमुळे छोट्या व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक फटका बसणार असून अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याची वेळ येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
संघटनेने स्पष्ट केले की, “शासनाने जर वेळेत मागणी मान्य केली नाही, तर हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्यात येईल.” अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हजारो कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाविरोधात नाराजीचे वातावरण आहे.
या मूक मोर्चाला व्यवसायिकांसह कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, यामुळे प्रशासनासमोरही दबाव निर्माण झाला आहे. “आम्ही सरकारकडे योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा ठेवत आहोत. अन्यथा पुढील काळात आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल,” असे ललित पाटील यांनी सांगितले.