मुंबई | प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. मात्र या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी लगेचच विराम देण्याचा प्रयत्न करत “जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही” असे स्पष्ट केल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही नव्याने उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे आज थेट विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांवर केलेले सूचक विधान.
विधानसभेच्या कामकाजात जयंत पाटील यांनी बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यभर सुरू असलेल्या पेटी-भांडी वाटप योजनेवर प्रश्न उपस्थित केला. पाटील म्हणाले, “पंतप्रधानांनी थेट डीबीटी करण्याचे आदेश दिले असताना, भांडी वाटपाची योजना का सुरू ठेवली? मफतलाल कपड्यांचे उत्पादन करतात हे माहीत आहे, पण ते भांडी बनवतात हे माहीत नव्हते.”
त्यावर मंत्री आकाश फुंडकर यांनी उत्तर देताना सांगितले, “मफतलाल कंपनी या निविदेत अपात्र ठरली आहे. 2020 मध्ये तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिलीत, तीच योजना आम्ही पुढे चालवत आहोत.”
यावर जयंत पाटलांनी आक्षेप घेत प्रशासनाचा निर्णय मंत्र्यांना न सांगण्याची पद्धत चुकीची असल्याचे नमूद केले. त्यांनी योजनेचे मूळ आणि आपली भूमिका स्पष्ट करत “एजंटांचा सुळसुळाट सुरू आहे, ठराविक लोकांना कामे दिली जात आहेत,” असा आरोपही केला.
याच वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटलांना “आपण सध्या प्रश्न विचारू शकता, पण उत्तर देता येणार नाही,” असे म्हणत माहोल हलका केला. परंतु त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीसांनी जागेवर उभे राहत सूचक विधान केले की, “अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून कारभार अधिक पारदर्शक केला जाईल.”
फडणवीसांचे हे विधान ऐकताच सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. जयंत पाटील भाजपच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चेला या विधानामुळे नवे बळ मिळाले आहे. राजीनामा दिला आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसली तरी त्यांच्या पुढील राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.