लाच घेतांना सहायक महसूल अधिकाऱ्यासह खासगी सेवक अटकेत !

जळगाव प्रतिनिधी | अतिक्रमण प्रकरणाच्या नकला मिळाव्यात यासाठी दोन हजार रूपयांची लाच स्वीकारतांना सहायक महसूल अधिकाऱ्यासह एका पंटरला आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने 16 जून रोजी गावातील ग्रामपंचायत सदस्याच्या अतिक्रमणाबाबत नकला मिळाव्यात यासाठी अर्ज केला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख विभागात कार्यरत असणारे सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर आणि त्यांचा खासगी सेवक संजय प्रभाकर दलाल या दोघांना ते भेटले. यात त्यांनी कागदपत्रांच्या बदल्यात दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यात चौदाशे रूपये शासकीय फी आणि सहाशे रूपये आमचे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या अनुषंगाने संबंधीत व्यक्तीने आज जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करण्यात आल्यानंतर पथक तयार करण्यात आले. या पथकाने प्रशांत सुभाष ठाकूर ( वय 49, सहायक महसूल अधिकारी जळगाव ) आणि संजय प्रभाकर दलाल ( खासगी व्यक्ती, वय 58, रा. शिवकॉलनी जळगाव ) या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. तपास केला असता 880 रूपयांचे शासकीय चलन आणि 1120 रूपयांची लाच घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

आजची ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक स्मिता नवघरे, सहायक उपनिरिक्षक सुरेश पाटील, चालक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.