कोकाटेंचे खाते बदलणार : राजीनाम्याऐवजी सुचविला दुसरा मार्ग !

मुंबई (प्रतिनिधी ) : वादात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसून त्या ऐवजी त्यांचे खाते बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली. परंतु आपण काहीही चुकीचं केल नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु अजित पवारांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महायुतीत कृषिखाते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पण माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्याने चुकीची वक्तव्य होत असल्याने त्यावरुन मोठी टीका सहन करावी लागत आहे. त्यामुळेच कोकाटे यांच्याकडील कृषिखाते आता मकरंद पाटलांकडे देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

मकरंद पाटील हे साताऱ्यातील मंत्री असून त्यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी आहे. मकरंद पाटील यांच्याकडे कृषिखाते देऊन त्यांच्याकडील खाते हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.