मुंबई | होंडा मोटरसायकलने आपल्या लोकप्रिय शाईन 100 या मॉडेलला आणखी आकर्षक आणि प्रीमियम बनवत नवीन होंडा शाईन 100 DX भारतात सादर केली आहे. विद्यमान शाईन 100 च्या तुलनेत नव्या DX व्हेरियंटमध्ये अधिक आधुनिक वैशिष्ट्ये आणि स्टायलिश डिझाईन देण्यात आले आहे.

नवीन शाईन 100 DX मध्ये मोठ्या आकाराची इंधन टाकी दिली असून, या डिझाईनमुळे बाईक आणखी ठसठशीत आणि दमदार दिसते. बोल्ड ग्राफिक्स, नवीन LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेडलाईट काउलवर तसेच एक्झॉस्ट पाईपवर दिलेले क्रोम इन्सर्ट्स बाईकला एक आधुनिक लुक देतात. यामुळे पारंपारिक शाईन 100 च्या तुलनेत ही बाईक अधिक तरुणाईला भुरळ घालेल, असा कंपनीचा विश्वास आहे.
शाईन 100 DX चार आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. यात पर्ल इंजिनस ब्लॅक, इम्पिरियल रेड मेटॅलिक, अॅथलेटिक ब्ल्यू मेटॅलिक आणि जेनी ग्रे मेटॅलिक या रंगांचा समावेश आहे. तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून हे रंग निवडण्यात आले आहेत.
या बाईकला स्टील फ्रेम देण्यात आली असून, ती टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि पाच-स्टेप ॲडजस्टेबल ट्विन शॉक अब्झॉर्बर्सवर चालते. १७ इंचांचे अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स यामुळे राइडचा अनुभव अधिक आरामदायी होतो.
या नवीन बाईकला ९८.९८ सीसीचे एअर-कुल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे ७,५०० RPM वर ७.२८ bhp पॉवर आणि ५,००० RPM वर ८.०४ Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले आहे, ज्यामुळे सामान्य शहरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
होंडाने जाहीर केलं आहे की शाईन 100 DX ची बुकिंग १ ऑगस्टपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. नव्या वैशिष्ट्यांसह शाईन 100 DX भारतीय ग्राहकांना एक विश्वासार्ह आणि स्टायलिश पर्याय देईल, असा विश्वास कंपनीला आहे.