मुंबई : काइनेटिक वॉट्स अँड वॉल्ट्स लिमिटेड या काइनेटिक ग्रुपच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने आज भारतात आपला नवा DX इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केला आहे. DX व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १.११ लाख रुपये असून DX+ व्हेरियंटची किंमत १.१७ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन स्कूटरमुळे प्रतिष्ठित काइनेटिक DX चे इलेक्ट्रिक अवतारात पुनरागमन झाले आहे.

नव्या काइनेटिक DX च्या डिझाईनला मूळ काइनेटिक होंडा DX पासून प्रेरणा मिळाली आहे. संपूर्ण डिझाईन सिलोएट जुन्या DX ला मान देत असले तरी त्यात आधुनिकतेचा स्पर्श जाणवतो. प्रत्येक पॅनलवर जुन्या DX चे संकेत दिसतात, पण ते पूर्णपणे ताजे आणि आधुनिक वाटतात. समोर खास LED हेडलाईट देण्यात आले आहे, ज्याला ‘काइनेटिक लोगो’ आकारातील LED DRLs आहेत. छोटासा व्हायझर आणि काइनेटिक ब्रँडिंग हे DX ला ओळख देतात.
या स्कूटरमध्ये ४.८kW हब-माउंटेड BLDC इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. २.६kWh LFP बॅटरी पॅकच्या मदतीने ही स्कूटर ११६ किमीपर्यंतची IDC रेंज देते. ARAI प्रमाणपत्र अद्याप जाहीर झालेले नाही. टॉप स्पीड ९० किमी प्रतितास असून यात रेंज, पॉवर आणि टर्बो असे तीन राईड मोड्स दिले आहेत. तसेच पार्किंगसाठी रिव्हर्स मोडचीही सुविधा आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर काइनेटिक DX मध्ये क्रूझ कंट्रोल, ८.८ इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह बिल्ट-इन स्पीकर, कीलेस सिस्टम, हिल होल्ड असिस्ट अशा अनेक सुविधा आहेत. यासोबतच ‘ईझी चार्ज’ सिस्टीम दिली आहे, ज्यामध्ये चार्जर स्कूटरच्या बॉडीमध्येच बसवलेले आहे.
या स्कूटरचे दोन व्हेरियंट आहेत – DX आणि DX+. DX+ मध्ये टेलीकिनेटिक टेलीमॅटिक्स सिस्टीम मिळते, ज्यामुळे जिओ-फेन्सिंग, व्हेईकल ट्रॅकिंग, फाइंड माय काइनेटिक अशा कनेक्टिव्हिटी फीचर्सचा लाभ घेता येतो. या स्कूटरसाठी तीन वर्षे किंवा ३०,००० किमीची वॉरंटी असून, ती नऊ वर्षे किंवा १ लाख किमीपर्यंत वाढवता येते.
बुकिंगला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात फक्त ४०,००० युनिट्सच आरक्षित केली जाणार आहेत. काइनेटिक DX ला बजाज चेतक इलेक्ट्रिक, TVS आयक्यूब, होंडा अक्टिवा ई: अशा दिग्गज स्पर्धकांशी टक्कर द्यावी लागणार आहे. तसेच अथर रिज्टा, ओला S1 प्रो आणि व्हिडा VX2 सारख्या नव्या इव्ही ब्रँड्सशीही स्पर्धा करावी लागणार आहे.