जळगाव- प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या रस्ता लुटीच्या गुन्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेला अभिजीत भगतसिंग राजपूत (वय २७, रा. मळाणे, ता. धुळे) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता धुळे जिल्ह्यातील मळाणे गावातून अटक केली आहे.

१६ डिसेंबर २०२४ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अक्षय उर्फ घोडा भीमराव पाटील याला ५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यावेळी अभिजीत राजपूतसह अजय भाईदास थोरात आणि संभाजी पाटील हे तिघे फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना अभिजीत राजपूत त्याच्या मूळ गावी मळाणे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हरिदास पाटील, प्रवीण मांडोळे, पोलीस शिपाई राहुल कोळी, दर्शना पाटील आणि चालक महेश सोमवंशी यांच्या पथकाला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.
शनिवारी दुपारी ४ वाजता या पथकाने मळाणे गावातून अभिजीत राजपूतला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने धरणगाव येथील गुन्ह्यासह अमळनेर, सोनगीर आणि धुळे येथे केलेल्या इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.