मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं स्मशान केलं आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच कंत्राटदारांना द्यायला तुमच्याकडे 80 हजार कोटी रुपये तुमच्याकडे नसतील तर हे राज्य तुम्ही डबघाईला आणलंय असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन मुख्यमंत्री हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत, कोणत्या जगात वावरत आहेत? आणि देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधानांनी किती मोठे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात दोन दिवस येऊन रहावे. आणि गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या कुटुंबीयांना बोलवावं आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे कसे स्मशान केले आहे हे समजून घ्यावं. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे.
हर्षल पाटीलला जलजीवन मिशनचे पैसे त्याला का मिळू शकले नाहीत यासाठी कोणते अधिकारी आणि कोणते मंत्री जबाबदार आहेत, त्यांच्यावर सरकार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहेत का? सरकारडे एक कोटी चाळीस लाख रुपये नाहीत? कंत्राटदारांची 80 हजार कोटी रुपये सरकारकडे अडकून आहेत. अनेक कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला. हर्षल पाटीलने आत्महत्या केली तरी सरकारमधील हे तीन लोकं मौजमजा करत फिरत होते असे संजय राऊत म्हणाले.