अजित पवारांच्या कोकाटेंना कानपिचक्या

मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे.

यांच्या वादग्रस्त वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये,शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच, विधिमंडळात ते चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, मी राजानामा देण्यासारखं काहीच केलं नाही, मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये जाहिरात आली ती स्कीप करत होतो, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली.

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी पत्रकारांनी बोलताना भाष्य केले. राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले.