पाच हजारांची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत

जळगाव-तक्रारदाराचा पगार काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांना जळगाव एसीबीने दालनातच रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदारांचा पगार काढून देण्यासाठी महिला अधिकार्‍याने आधी दहा हजार रुपये मागितले व पाच हजारात तडजोड ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नगरे यांच्यासह पथकाने हा सापळा यशस्वी केला.

या कारवाईने जिल्हा परिषदेतील लाचखोर पुरते हादरले आहेत. गेल्या अनेक महिन्यानंतर जिल्हा परिषदेत लाचखोरांवर कारवाई झाल्याने सर्वसामान्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.