भाडेवाडीच्या निषेधार्थ जळगाव शहरातील 16 मार्केट मधील गाळेधारकांचे मार्केट बंद आंदोलन

जळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये रेडीरेकनर दराच्या ५ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात गाळेधारकांनी सोमवारी (२७ मे) दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील १६ मार्केट बंद ठेवत जोरदार आंदोलन केले. महानगर गाळेधारक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. त्यानंतर महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन गाळेधारकांनी सविस्तर निवेदन सादर केले.
महापालिकेच्या ताब्यातील एकूण २,३६८ गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत २०१२ सालीच संपली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून, आता रेडीरेकनर दराच्या ५ टक्के प्रमाणे भाडे आकारण्याचा प्रस्ताव गाळेधारकांसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, हे दर अविकसित मार्केटमधील गाळेधारकांना परवडणारे नाहीत, असे स्पष्ट करत गाळेधारक संघटनेने याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. तसेच, गाळेधारकांच्या मागण्या विचारात घेऊन भाडे निर्धारण, गाळा हस्तांतरण व नूतनीकरण समितीत तज्ञ सदस्य म्हणून संघटनेचे प्रतिनिधी सहभागी करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
गाळेधारकांची प्रमुख मागणी म्हणजे रेडीरेकनर दराच्या ५ टक्क्याऐवजी २ टक्के दर २०१७-१९ च्या कालावधीसाठी लागू करावा. तसेच या विषयात पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बंद असलेली प्रमुख बाजारपेठा:
छत्रपती शाहू मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी. जे. मार्केट, रामलाल चौबे मार्केट, धर्मशाळा मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, जुने शाहू मार्केट, भास्कर मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळील दुकाने, रेल्वे स्टेशन परिसर, गंदालाल मिल मार्केट, साहू दवाखाना परिसर, लाठी शाळा मार्केट आणि भोईटे मार्केट ही १६ ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती.
डॉ. शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, युवराज वाघ, आशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील, तेजस देपुरा, वसीम काझी, पंकज मोमाया, कमलेश तलरेजा, शिरीष थोरात, गिरीश अग्रवाल, राजेश समदाणी, हेमंत परदेशी, सुनील गगडाणी, संजय अमृतकर, विनोद पांडे, अनिल पाटील, ऋषी सोळुंके, संभाजी निंबाळकर, योगेश बारी, केशव नारखेडे, ललित मराठे, अमित भागवाणी आदी व्यापारी उपस्थित होते.