दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण : एक आरोपी पोलिस कोठडीत; दोन संशयित फरार

दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण : एक आरोपी पोलिस कोठडीत; दोन संशयित फरार

एरंडोल : शहरातील पांडव वाड्यामागील परिसरात दुचाकी लावण्याच्या कारणावरून रविवारी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस सोमवारी एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण ५ संशयित आरोपी असून त्यात २ महिला संशयितांचा समावेश आहे.

दरम्यान, २ आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. लवकरच फरार आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास तपास अधिकारी, पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोल कैलास पाटील या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून अधिक तपास सुरू आहे.