चिखलोड येथे विजेचा कहर : दोन म्हशी ठार, शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान

चिखलोड येथे विजेचा कहर : दोन म्हशी ठार, शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान

पारोळा : पारोळा तालुक्यात २६ मे रोजी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा आणि दमदार पावसाचा जोर होता. याच दरम्यान, चिखलोड खुर्द येथील शेतकरी युवराज विठ्ठल पाटील यांच्या शेतात बांधलेल्या दोन म्हशींवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. मयत म्हशींचा पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील काही भागांत किरकोळ नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. पारोळा शहरासह परिसरात दुपारी २ ते ३.३० या वेळेत ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत केले.