पतपेढी गैरव्यवहार प्रकरणी १६ संचालक न्यायालयीन कोठडीत

भुसावळ- (प्रतिनिधी): भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीमध्ये ९ कोटी ९० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी २८ जुलै रोजी १६ जणांना अटक केली आहे. याबाबत ४५ जणांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात पतपेढीचे आठ संचालक आणि आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हा अपहार सन २०१६ ते २०२१ या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. सभासदांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करून संचालक आणि कर्मचाऱ्यांनी ९ कोटी ९० लाख रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणादरम्यान (ऑडिट) उघडकीस आले. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या ऑडिटरने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या बोगस कर्ज प्रकरणाबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार, सुरुवातीला एकूण ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत २८ जुलै रोजी १६ संशयितांना अटक केली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये गंगाराम सीताराम हेगडे (पिंप्राळा, जळगाव), हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे (सावदा, ता. रावेर), राजू लालू गायकवाड (भुसावळ), हितेश संजय नेहते (भुसावळ), रमेश चिंधु गाजरे (फैजपूर, ता. यावल), कृष्णा गजमल सटाले (रा. जामनेर), मधुकर श्रीकृष्ण लहासे (पहूर, ता. जामनेर), सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा, ता. रावेर), कैलास पंडित तायडे (जळगाव), पंकज मोतीराम ढाके (रा. भुसावळ), संजय तुळशीराम चौधरी (रा. जामनेर), अझरुद्दीन राजेंद्र तडवी (रा. फैजपूर), राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ), जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ), राजेश देविदास लहासे (भुसावळ) आणि हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर) यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतील गैरव्यवहारावर कठोर पावले उचलली गेली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून, आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.