मुंबई – प्रतिनिधी । माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, खातेबदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली असून कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ समोर आले होते. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. या अनुषंगाने माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केली.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हीडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढत चालला होता. मात्र, राजीनामा न घेता, खातेबदल करून कोकाटेंना एकप्रकारे दिलासा देण्यात आला आहे.
लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी गोंधळ होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर तर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीच जोर धरू लागली होती.