रावेर- प्रतिनिधी । सातपुडा जंगल सफारी प्रकल्पाचे शनिवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाल येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे नाशिक विभागाला पहिली जंगल सफारी मिळाली असून, यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल जावळे, सहाय्यक वन उपसंरक्षक अधिकारी समाधान पाटील, तहसीलदार रावेर बंडू कापसे, यावल उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या जंगल सफारीमुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांनी स्थानिक युवकांना येथे छोटेखानी ढाबे आणि हॉटेल्स सुरू करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्यांना व्यवसाय मिळेल आणि पर्यटकांचीही सोय होईल. प्रशासनातर्फे लवकरच या ठिकाणी १० ते १२ जागा निश्चित करण्यात आल्या असून, या ठिकाणी पर्यटकांना मुक्कामासाठी इको हट यावल वन विभागामार्फत तयार करण्यात येत आहेत.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः तिकिटे विकत घेऊन जंगल सफारीचा आनंद घेतला. सुरुवातीला कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. आमदार अमोल जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डीपीडीसीच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी डार्क स्काय संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेमुळे पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात आभाळाखाली बसून आकाशातील चंद्र-ताऱ्यांचा सुंदर अनुभव घेता येणार आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते वनधन केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. या केंद्रात आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या सुंदर कलाकुसरीच्या वस्तू आणि वनौषधी उपलब्ध असतील. गुलाबराव पाटील यांनी स्वतः वनौषधी खरेदी करून या केंद्राचे अनोखे उद्घाटन केले. यावेळी चोपडा, यावल, रावेर प्रभागातील सर्व वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.