सर्व्हर डाऊनमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला मोठा अडथळा; विद्यार्थ्यांची चिंता वाढली

सर्व्हर डाऊनमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला मोठा अडथळा; विद्यार्थ्यांची चिंता वाढली

जळगाव : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडथळ्यांनी ग्रासले असून, सलग तिसऱ्यांदा सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ पुन्हा एकदा बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजेपासून संकेतस्थळ कार्यान्वित झाले होते. मात्र, केवळ एका तासातच ते डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थी आणि पालकांची धांदल उडाली.

एस.एस.सी.चा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप स्थिरावलेले नाही. शासनाने २६ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर केले असून, ३ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, संकेतस्थळाचा सततचा बोजवारा आणि तांत्रिक त्रुटींमुळे ही प्रक्रिया अयशस्वी ठरतेय, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.

दरम्यान, संकेतस्थळ बंद असल्याने नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ५ जून रोजी जाहीर होणारी तात्पुरती गुणवत्ता यादीही विलंबाने प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी, संपूर्ण वेळापत्रक कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शासनाने यापूर्वी संकेतस्थळात तीन वेळा सुधारणा केल्या असल्या तरीही यंत्रणा अद्याप स्थिर झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि पालकांना या प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता आणि स्थिर सेवा मिळावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.