परवाना नसताना लाकूड वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

चाळीसगाव : परवाना नसताना लाकूड वाहतूक करणारा ट्रक चाळीसगाव–काजगाव मार्गावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. ही कारवाई २५ मे रोजी करण्यात आली असून, ट्रकसह लाकूड जप्त करण्यात आले आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्रातील चाळीसगाव ते काजगाव रस्त्यावर वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना एमएच-११ एम-४३२३ या क्रमांकाचा ट्रक लाकूड वाहतूक करताना दिसून आला. सदर ट्रककडे लाकूड वाहतुकीचा अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आल्याने ट्रक व लाकूड जप्त करण्यात आले.
या प्रकरणी ट्रकचालक शेख इरफान शेख शफी (रा. मालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक प्रविण ए., सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, ललित पाटील, अजय महिरे, भटू अहिरे, सी. व्ही. पाटील, आर. बी. पवार यांच्या पथकाने केली.