जानवे येथे ग्रामपंचायतीच्या शिपायाचा विहिरीत पडून मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील जानवे शिवारात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवरील वीज पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शिपायाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २३ मे) रात्री आठच्या सुमारास घडली.
मृताचे नाव दीपक बाबुलाल पाटील (वय ४५) असून ते जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाच विहिरींवरील वीज पंप सुरू–बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. गुरुवारी सायंकाळी विहिरीवरील पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दीपक पाटील यांनी पंप सुरू न झाल्याने पाईप हलवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोल जाऊन ते विहिरीत पडले.
ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.