‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत साडेचार लाखांचा ऐवज असलेली पर्स परत

ऑपरेशन अमानत’अंतर्गत साडेचार लाखांचा ऐवज असलेली पर्स परत

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अकोला रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीजवळ विसरलेली सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे संबंधित महिला प्रवाशाकडे परत करण्यात आली. ‘ऑपरेशन अमानत’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

ही घटना २१ मे रोजी घडली. मुंबईच्या वरळी परिसरातील रहिवासी फरिनाज इलियास शेख (वय ३३) या महिला प्रवासी 12105 विदर्भ एक्सप्रेसने अकोला स्टेशनवर आल्या होत्या. बुकिंग हॉलमध्ये तिकीट घेताना त्यांची पर्स तेथेच राहिली होती. गस्त घालणारे आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक नितीन मिखी आणि शेख शोएब यांना ही पर्स आढळून आली. पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता.

कोणताही दावा न झाल्याने ती पर्स आरपीएफ कार्यालयात जमा करण्यात आली. काही वेळाने फरिनाज शेख व त्यांचे पती इलियास नूर मोहम्मद शेख (वय ४०) हे पर्स हरविल्याची चौकशी करण्यासाठी आरपीएफ कार्यालयात आले. आवश्यक कागदपत्रे, ओळख पटवणारे पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे खात्री करून आरपीएफने पर्स त्यांना परत केली.