६ कोटींच्या दरोड्याचा सूत्रधार पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार; खळबळजनक उलगडा

६ कोटींच्या दरोड्याचा सूत्रधार पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार; खळबळजनक उलगडा

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर ६ कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा सूत्रधार अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री एन्काऊंटरमध्ये ठार केले. खोतकरने पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करत त्याचा खात्मा केला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी १५ मे रोजी लड्डा यांच्या वाळूजमधील बंगल्यावर पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी हल्ला चढवून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. त्यात साडेपाच किलो सोनं, ३२ किलो चांदी आणि रोख रक्कमेचा समावेश होता. ही घटना उद्योजक लड्डा हे कुटुंबासह अमेरिकेत असताना घडली. बंगल्याची देखरेख त्यांच्या १९ वर्षांपासूनच्या विश्वासू कामगार संजय झळकेकडे होती.

या दरोड्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या सात आणि वाळूज पोलिस ठाण्याच्या दोन अशा एकूण नऊ पथकांनी तपास मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अमोल खोतकर पसार होता.

सोमवारी रात्री खोतकरचा ठावठिकाणा लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, साडेबारा ते एकच्या सुमारास खोतकरने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि नंतर मृत्यू झाला.

पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यामुळे दरोड्याच्या गुन्ह्याचा मोठा तपशील उघड होण्याची शक्यता असून उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.