दुचाकींसाठी ‘एमएच-19/ईआर’ नोंदणी मालिका 2 जूनपासून; आकर्षक क्रमांकासाठी अर्ज 28 व 29 मे दरम्यान सादर करावेत

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच-19/ईआर 0001 ते 9999’ या नवीन नोंदणी क्रमांक मालिकेला 2 जून 2025 पासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी 28 व 29 मे रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पसंतीच्या क्रमांकासाठी अर्जासोबत वाहनधारकाने विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DD) “उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव” यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून तयार करून सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदाराचे आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पत्त्याचा पुरावा तसेच वाहन ज्याच्या नावे नोंदणी करावयाचे आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहितीही देणे बंधनकारक आहे.
क्रमशः पुढील प्रक्रिया:
29 मे रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल.
जर एखाद्या क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज प्राप्त झाले, तर संबंधित अर्जदारांनी 30 मे रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत वाढीव रकमेचा DD स्वतंत्र बंद लिफाफ्यात सादर करावा.
हे बंद लिफाफे 30 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडले जातील.
सर्वाधिक रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल, तर उर्वरित अर्जदारांचे डीडी परत करण्यात येतील.
नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.