पाच किलो सोन्याची महामार्गावर लूट : फर्दापूर टोलनाक्याजवळ सिनेस्टाईल आरोपी पसार

चालकानेच विश्वासघात करीत व्यापार्‍याला दरोडेखोरांच्या ताब्यात दिले

Five kg gold looted on highway: Cinestyle accused flees near Fardapur toll plaza फर्दापूर (29 ऑगस्ट 2025) : पोटदुखीचा बनाव करीत चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घ्यायला लावल्यानंतर अचानक आलेल्या दरोडेखोरांनी व्यापार्‍याचे सुमारे पाच किलो सोने लूटल्याने खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) हे खामगाव येथून मुंबईकडे सोन्याचा ऐवज घेऊन निघाले होते. त्यांनी भाड्याने घेतलेल्या इनोव्हा गाडीतून प्रवास सुरू केला. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फर्दापूर टोलनाका ओलांडल्यानंतर चालकाने अचानक पोटदुखीचे कारण सांगून गाडी बाजूला उभी करण्यास सांगितले. व्यापार्‍याने गाडी थांबविताच पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनातून चार ते पाच अज्ञात दरोडेखोर उतरले. त्यांनी व्यापार्‍याला चाकूचा धाक दाखवत मिरचीपूड डोळ्यात फेकली.

यावेळी व्यापार्‍याचा चालकानेच सोन्याने भरलेली बॅग उचलून थेट दरोडेखोरांच्या गाडीत बसकण घेतली. क्षणातच दरोडेखोरांनी आपली गाडी सुरू करून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पलायन केले. व्यापारी काही क्षणातच भांबावून गेला तर चालक आणि दरोडेखोर पावणे पाच किलो सोने घेऊन रफूचक्कर झाले.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दरोडेखोरांची गाडी मालेगाव टोलनाका ओलांडून पातूरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. मात्र, पातूरच्या जंगलाजवळ दरोडेखोरांनी आपली गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे समोर आले आहे.