Yaval taluka shaken by murder: Suspect who killed young man from Dahigaon surrenders यावल (30 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था पुरती ढासळली आहे. सातत्याने होणार्या अप्रिय घटनांनी समाजमन व्यथीत झाले आहे. यावल तालुक्यातील दहिगाव येथील 21 वर्षीय तरुणाची दोन तरुणांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ईम्रान युनूस पटेल (21, सुरेश आबा नगर, दहिगाव, ता.यावल) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. खुनानंतर दोन्ही आरोपी यावल पोलिसांना शरण आले.

काय घडले दहिगावात ?
ई्रमान पटेल या तरुणाची दहिगावबाहेर जाणार्या विरावली रस्त्यावर दोघा संशयीतांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हत्या केली. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर संशयीत ज्ञानेश्वर गजानन पाटील (19) व गजानन रवींद्र कोळी (19) हे यावल ठाण्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजता दुचाकी (एम.एच.19 ईएफ.3859) ने आले व त्यांनी घडला प्रकार सांगताच पोलिस यंत्रणेला धक्का बसला.
पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक निरीक्षक अजय वाढवे, वासुदेव मराठे व पोलिस पथकाने धाव घेतली तसेच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने पंचनामा करीत मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. हत्येचे ठोस कारण अद्याप समोर आले नसलेतरी जुना वाद वाद तसेच आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.