भुसावळ पालिका निवडणूक : आज सुटीच्या दिवशीही स्विकारणार हरकती

दाखल झालेल्या हरकतींमध्ये प्रामुख्याने सिमांकन, वगळलेला हद्दीचा भाग समाविष्ठतेच्या मागण्या

Bhusawal Municipal Election : Objections will be accepted even on a holiday today भुसावळ (31 ऑगस्ट 2025) : भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रारुप प्रभाग रचना सोमवार, 18 ऑगस्टला जाहिर झाली. या प्रभाग रचनेवर 31 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत आहे मात्र शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पालिका प्रशासनाकडे केवळ पाच हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकतीसाठी रविवारपर्यंत मुदत असली तरी शनिवार व रविवारी कार्यालयास सुटी आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हरकती स्विकाराव्या किंवा नाही? याबाबत स्पष्टता नव्हती मात्र रविवारी पालिकेच्या कामकाजाला सुटी असती तरी हरकती स्विकारल्या जातील. यासाठी पालिकेत स्वतंत्र टेबल देण्यात येणार आहे. यामुळे आगामी दोन दिवस काही हरकती अजून वाढू शकतील. पालिकेकडे दाखल झालेल्या हरकतींमध्ये प्रामुख्याने सीमांकन, वगळलेला हद्दीचा भाग समाविष्ठ करणे आदींच्या समावेश आहे.

पुढील प्रक्रिया अशी
पालिकेकडे प्रारुप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींवर 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. यानंतर 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान सुनावणीनंतर हरकती नगर विकास विभागाकडे सादर होतील. 12 ते 18 सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांनी अंतीम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर होईल. 26 ते 30 सप्टेंबरच्या काळात राज्य निवडणूक आयोगाकडून अंतीम प्रभाग रचना अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केली जाईल.

अशा आहेत हरकती
राजेंद्र नाटकर- प्रभाग क्रमांक सहामधील कुलकर्णी प्लॉट व मेथाजी मळ्याचा काही भाग प्रभाग पाचमध्ये समाविष्ठ केला आहे. 10 वर्षांपासून तो प्रभाग सहामध्ये असल्याने पुन्हा समाविष्ठ करावा.

दिनेश नेमाडे- प्रभाग क्रमांक 22 मध्ये येणारा ब्लॉक क्रमांक 258 हा प्रभाग क्रमांक 25 मध्ये जोडला गेला आहे. दळण-वळण, भौगोलिक स्थितीचा विचार करुन तो प्रभाग क्रमांक 22 मध्ये जोडण्यात यावा.

समीर कर- रेल्वे गार्ड लाईन व रेल्वे कॉर्टरचा भाग हा प्रभाग 13 चा भाग आहे. मात्र तो प्रभाग 12 मध्ये दाखविण्यात आला आहे. गार्ड लाइन रेल्वे कॉर्टरचा भाग प्रभाग 13 मध्ये समाविष्ठ करावा.

ललित मराठे- गेल्या दहा वर्षांपासून मेथाजी मळा व कुलकर्णी प्लॉट भाग हा प्रभाग सहामध्ये येतो. हा भाग प्रारुप रचनेत प्रभाग पाचमध्ये समाविष्ठ केला आहे. तो पूर्वीप्रमाणे प्रभाग पाचमध्ये घ्यावा.

दीपाली वाणी- प्रभाग 24 व 25 मध्ये दिनदयालनगरचा उल्लेख नाही. तसेच नवीन हुडको प्रभाग 25 ला जोडले आहे. हा भाग हायवेच्या विरुध्द भागात आहे. यामुळे तो वगळण्यात यावा.

डिनर डिप्लोमसी, गोवा पर्यटन
शहरात भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी डझनभर इच्छूक तयार आहेत. गेल्या काळात एका माजी नगरसेवक पतीने वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवकांना जंगी पार्टी देत डिनर डिप्लोमसी राबवली तर एका माजी नगरसेवकाने दहा नगरसेवकांना गोवा पर्यटन घडवले. याबाबतचे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने आता नगराध्यक्षपदासाठी लॉबींग होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय डावपेच आखणी
पालिकेची निवडणूक भाजपचे मंत्री संजय सावकारे विरुध्द माजी आमदार संतोष चौधरी अशीच होईल. या निवडणुकीत भाजप विरुध्द चौधरी सर्व पक्षीयांची मोट बांधून निवडणूक लढवू शकतात, असा अंदाज आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकिय गोटातून डावपेच आखणी सुरु झाली आहे. मतदारांसोबत संपर्क वाढविण्यासाठी इच्छूक प्रयत्नशिल आहेत. नागरिकांना मुलभूत सेवा सुविधांबाबत निर्माण होणार्‍या अडी-अडचणी सोडविण्यावर भर दिला जात आहे.

सर्व पालिकांना सूचित केले
प्रारुप प्रभाग रचनेवर हरकतींसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अखेरच्या दोन्ही दिवस सुटी असली तरी प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती स्विकारता येतील. यासाठी सर्व पालिकांना सूचीत केले आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर पुढील काळात सुनावणी होईल, असे जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग जनार्दन पवार म्हणाले.