गोळीबाराचा आवाज अन् यावल तालुक्यात शिकारी अडकले जाळ्यात

Major action by Yaval Forest Department : Poachers who hunted five peacocks caught in the net यावल (1 सप्टेंबर 2025) : यावल वनविभागाने गोपनीय माहितीद्वारे मोरांची शिकार करणार्‍या दोन शिकार्‍यांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच मृत मोर, एअर रायफल, चाकू, टॉर्च व मोटरसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आले. सलीम रुबाब तडवी व सय्यद अफसर अली मुशताक अली (दोघेही मारूळ, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे असून दोघांनी गोळीबार केल्याचे स्वतः कबूल केले आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली.

वनविभागाने केली गोपनीय माहितीद्वारे कारवाई
रविवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास फैजपूर वनपाल यांना शिकार्‍यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सोबत घेत वनकर्मचार्‍यांनी वनोली शिवारात सापळा रचला. काही वेळातच बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली असता दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाल करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून एक एअर रायफल, दोन चाकू, टॉर्च, एक मोटरसायकल तसेच एका पोत्यात पाच मृत मोर सापडले. हे साहित्य व मृत पक्षी जप्त करण्यात आले. वनरक्षक बोरखेडा बु.॥ यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींना सोमवार, 1 सप्टेंबर 2025 रोजी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक निनू सोमराज, यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी (पूर्व) स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.