एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : लिफ्टच्या बहाण्याने लूट करणार्‍या नशिराबादच्या आरोपींना अटक

MIDC police action: Accused who robbed while giving lift arrested जळगाव (1 सप्टेंबर 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी लिफ्टच्या बहाण्याने लूट करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वसीम अजमल खान (35, रा.नशिराबाद) व जाफर उल्ला कहुल्ला कासार (42, रा.साथी बाजार, नशिराबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

लिफ्टच्या बहाण्याने झाली होती फसवणूक
सोमवार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती धुळे येथे जाण्यासाठी अजिंठा चौकातील बस थांब्यावर बसची वाट पाहत असताना चारचाकी वाहन त्याच्याजवळ थांबले. त्या वाहनातील अज्ञात व्यक्तींनी त्याला कुठे जायचे आहे असे विचारले. धुळे येथे जायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी ‘आम्ही तुम्हाला सोडून देतो,’ असे सांगून त्याचा विश्वास जिंकला. गाडीत इतर प्रवासी असल्याचे भासवून त्याला पुढील सीटवर बसण्यास सांगितले. थोड्या अंतरावर गेल्यावर गाडीत जागा नाही, असे सांगून त्याला खाली उतरवले आणि ते पुढे निघून गेले.

मोबाईल आणि रोकडची चोरी
गाडीतून उतरल्यानंतर त्या व्यक्तीला आपला मोबाईल आणि खिशात असलेली 22 हजार 500 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. तात्काळ त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.

गोपनीय माहितीद्वारे आरोपींना अटक
नशिराबाद येथील बाजार परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली 22 हजार 500 रुपयांची रोकड, मोबाईल आणि गुन्हा करताना वापरलेली पाच लाख रुपये किंमतीची मारुती अर्टीगा गाडी जप्त केली. अटकेतील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.